शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहर हे केवळ औद्योगिकच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. अशा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमुळे आपल्या शहरातील तरुणांना प्रेरणा मिळते आणि त्यांना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळते, महापालिका क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या महापौर चषक ६६ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद आणि ६३ व्या ज्युनियर शरीरसौष्ठव स्पर्धेचा अंतिम निकाल महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत देशभरातील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पहिल्या दिवशी विविध गटांतील प्राथमिक फेऱ्या आणि ज्युनियर स्पर्धा रंगल्या, तर दुसऱ्या दिवशी अंतिम फेऱ्या अत्यंत चुरशीने पार पडत विजेत्यांची निवड करण्यात आली. स्पर्धेदरम्यान खेळाडूंची उत्कृष्ट तयारी, आत्मविश्वास आणि कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन पाहायला मिळाले.
इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन आणि पिंपरी चिंचवड अमॅच्युअर बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत देशभरातील खेळाडूंनी सहभाग घेतला. पुरुष व महिला अशा विविध गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत उत्कृष्ट शरीरसौष्ठव कौशल्याचे दर्शन घडले.
महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सर्व गटांतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम (बापू) जाधव, माजी उपमहापौर तथा नगरसदस्य राजू मिसाळ, माजी नगरसेविका सुषमा तनपुरे, राष्ट्रीय खेळाडू किशोर डांगे, मिस्टर कामराज, छत्रपती पुरस्कार विजेते सिद्धार्थ मोरे, अभिनेते शिवभक्त सचिन गवळी, महापालिका उपायुक्त पंकज पाटील, क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे, इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचे महासचिव डॉ. संजय मोरे, खजिनदार राजेश सावंत, अॅड. सचिन रणदिवे, राजेंद्र नांगरे, नारायण पडेकर (शिर्डी संस्थान), लोकनृत्य कलाकार शिवम इंगळे, क्रीडा समन्वयक दीपक कन्हेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या हरमीत सिंगने मारली बाजी
महापौर चषक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून विविध गटांमध्ये देशभरातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. स्पर्धेतील सर्वोच्च ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ (भारत श्री) किताब महाराष्ट्राच्या हरमीत सिंग यांनी पटकाविला, तर उपविजेतेपद महाराष्ट्राच्याच उमेश गुप्ता यांनी मिळविले.
स्पर्धेचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे:
मुख्य निकाल (चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन):
* ‘भारत श्री २०२६’ विजेता – हरमीत सिंग (महाराष्ट्र)
* उपविजेता – उमेश गुप्ता (महाराष्ट्र)
मेन्स बॉडीबिल्डिंग:
* ५५ किलो – राजेश तरवे (महाराष्ट्र)
* ६० किलो – संदीप सावळे (महाराष्ट्र)
* ६५ किलो – किरण शिंदे (महाराष्ट्र)
* ७० किलो – उमेश गुप्ता (महाराष्ट्र)
* ७५ किलो – फेलिक्स जोएल (कर्नाटक)
* ८० किलो – नाम्मि नायडू (कर्नाटक)
* ८५ किलो – रोबी मेईतेई (मणिपूर)
* ९० किलो – मॅराडोनाक्ष (मणिपूर)
* १०० किलो – हरमीत सिंग (महाराष्ट्र)
* १०० किलो वरील – निलेश दगडे (महाराष्ट्र)
मेन्स क्लासिक:
* १७१ सेमी पर्यंत – आकाश दाडमल (महाराष्ट्र)
* १७५ सेमी पर्यंत – विश्वंभर रावल (महाराष्ट्र)
* १८० सेमी पर्यंत – संदेश नलवडे (महाराष्ट्र)
* १८० सेमी वरील – दीपक साहू (ओडिसा)
मेन्स फिजीक:
* १७१ सेमी पर्यंत – आकाश दाडमल (महाराष्ट्र)
* १७५ सेमी पर्यंत – जिंतू कर (आसाम)
* १८० सेमी पर्यंत – निलेश गुरव (महाराष्ट्र)
* १८० सेमी वरील – स्वागत पाटील (महाराष्ट्र)
इतर गट:
* मेन्स फिट मॉडेल (ओपन) – समाधान निसाळ (महाराष्ट्र)
* महिला फिजीक (ओपन) – रेखा शिंदे (महाराष्ट्र)
* महिला बॉडी फिटनेस (ओपन) – ज्योती पाल (दिल्ली)



