पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी : युनूस खतीब)
किरकोळ वादातून सुरू झालेल्या भांडणाचे गंभीर रूप धारण करत चार जणांनी तरुणावर ऊसाने व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना एमआयडीसी भोसरी परिसरात घडली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता इंद्रायणी कॉर्नर येथील जय गणेश रसवंती गृह येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी दि. ३० मार्च २०२६ रोजी पहाटे २.०९ वाजता एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
या प्रकरणी शुभम सिद्धार्थ नवगिरे (वय २७, रा. भोसरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादीला त्यांच्या भावाने बोलावल्याने ते घटनास्थळी गेले असता, आरोपी आधीपासून संगनमत करून उभे होते. जुन्या वादाच्या कारणावरून फिर्यादीच्या भावाशी बाचाबाची सुरू असताना, फिर्यादीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी आरोपी आदित्य कांबळे याने “तू जास्त शहाणा झाला आहेस का?” असे म्हणत रसवंतीवर असलेला ऊस उचलून फिर्यादीवर हल्ला केला. त्यानंतर आरोपी सारंग ओरसे याने लाथाबुक्यांनी मारहाण केली. दरम्यान, फिर्यादीचा भाऊ मध्यस्थी करण्यासाठी आला असता, आरोपी प्रकाश विद्यागज आणि सुमित कांबळे यांनी त्यालाही ऊसाने मारहाण केली.
या घटनेत दोघेही जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बिराजदार करत आहेत.



