पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी : युनूस खतीब)
नामांकित ब्रँडची बनावट उत्पादने तयार करून विक्री करणाऱ्या प्रकरणाचा पिंपरी परिसरात भंडाफोड झाला असून, बनावट ‘पुमा’ कंपनीच्या लोगोचे कपडे विक्रीस ठेवणाऱ्या एका व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता साई चौक, पिंपरी येथील लेजंड चॉईस दुकानाजवळ (चिराग फर्निचर शेजारी, शनी मंदिराजवळ) ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रात्री ११.४६ वाजता पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
या प्रकरणी नीरजकुमार नरेंद्रकुमार दहीया (वय ३८, रा. गाझियाबाद, उत्तरप्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी इस्माईल इस्तीखर खान (वय ३१, रा. काळेवाडी, पिंपरी, पुणे) याने नामांकित Puma कंपनीचा लोगो वापरून बनावट टी-शर्ट, हाफ पॅन्ट आणि ट्रॅकपॅन्ट तयार करून विक्रीस ठेवले होते.
छाप्यामध्ये एकूण ₹८६,१८४ किमतीचा बनावट माल जप्त करण्यात आला. आरोपीने ग्राहकांची तसेच कंपनीची फसवणूक करून आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने हा बनावट माल स्वतःच्या ताब्यात ठेवला होता, असे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१८ (४), ३४७, ३४९ तसेच कॉपीराईट कायदा कलम ५१, ६६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस नोटीस बजावण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वारे करत आहेत.



