शबनम न्यूज | पुणे
‘आयएएस होणे ही मोठी गोष्ट आहे. मात्र यूपीएससीचे अवाजवी महत्त्व निर्माण करून ठेवले आहे. अनेकांनी ही परीक्षा म्हणजे आयुष्य करून ठेवले आहे. वास्तविक, ही परीक्षा आयुष्याचा एक छोटा भाग आहे. या परीक्षेतील यशापयश तुमची किंमत ठरवत नाही,’ अशी भूमिका राज्यातील पहिली मुस्लिम महिला आयएएस अधिकारी आदिबा अनाम यांनी मांडली. युनिक ॲकॅडमीतर्फे ‘युनिक टॉपर्स टॉक’ या कार्यक्रमात यूपीएससी २०२४ मध्ये देशात १४२ वा क्रमांक पटकावलेल्या आदिबा अनाम यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
सेनापती बापट रस्ता येथील विश्वभवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी युनिक ॲकॅडमीचे तुकाराम जाधव, मल्हार पाटील, जव्वाद काझी, निजामुद्दीन शेख, प्रवीण चव्हाण या वेळी उपस्थित होते.
अनाम यांनी त्यांच्या भाषणातून त्यांच्या आयएएस होण्यापर्यंतचा प्रवास उलगडला. त्या म्हणाल्या, ‘या परीक्षेचा अभ्यास खूप थकवतो. मात्र, यश मिळण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवावेच लागते. आपण १०० टक्के प्रयत्न केल्याचे समाधान मिळाले पाहिजे, इतके प्रयत्न केले पाहिजेत. चांगले प्रयत्न करूनही यश न मिळाल्यास तो नशिबाचा भाग असतो. प्रत्येक यशवंताची पद्धत वेगळी असते. त्यामुळे कोणी काय केले याचा विचार न करता स्वतःचा विचार करायला हवा.