spot_img
spot_img
spot_img

वाढदिवसानिमित्त साधेपणा; डब्बू आसवाणी यांचे सामाजिक भान जपणारे आवाहन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी यांचा वाढदिवस यंदा अत्यंत साधेपणाने साजरा होत असून, त्यांच्या सामाजिक जाणिवेचा प्रत्यय पुन्हा एकदा शहरवासीयांना आला आहे.

दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात वाढदिवस साजरा करणारे डब्बू आसवाणी यांनी यंदा मात्र वेगळा आदर्श घालून दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वाढदिवसाचा उत्सव टाळण्याचा निर्णय घेतला आहे. “शुभेच्छा स्वीकारणार आहे, मात्र केक किंवा पुष्पगुच्छ आणू नका. त्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणावे,” असे भावनिक आणि सामाजिक भान जपणारे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

“नारळासारखा बाहेरून कडक पण आतून मऊ, आणि नारळाच्या पाण्यासारखा गोड स्वभाव” अशी ओळख असलेल्या आसवाणी यांचा स्वभाव कामाच्या बाबतीत कडक, तर वागण्यात अत्यंत नम्र आणि गोड असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांकडून सांगितले जाते. कार्यक्षमतेसोबतच मानवी मूल्यांना प्राधान्य देणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

डब्बू आसवाणी यांनी 2007 साली प्रथमच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत निवडून येत राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 2012, 2017 आणि आता 2026 मध्येही ते निवडून आले असून, त्यांनी उपमहापौर तसेच स्थायी समिती सभापती यांसारखी महत्त्वाची पदे यशस्वीपणे भूषवली आहेत. सातत्यपूर्ण जनसंपर्क, विकासकामांवरील भर आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन यांच्या जोरावर ते चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

सिंधी समाजातून येणारे आसवाणी यांना पिंपरी परिसरातील व्यापारी वर्गाचा मोठा पाठिंबा लाभला आहे. मात्र, केवळ एका समाजापुरते मर्यादित न राहता सर्व समाजघटकांमध्ये मिसळून काम करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांची लोकप्रियता अधिक वाढली आहे.

वाढदिवसानिमित्त आज सकाळी त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करून दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर ते आपल्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

डब्बू आसवाणी यांच्या या साधेपणाच्या निर्णयाचे आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, समाजासाठी काहीतरी देण्याची प्रेरणा त्यांच्या या कृतीतून मिळत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!