शबनम न्यूज | प्रतिनिधी
पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर अत्यंत सोपा, कमी खर्चिक आणि परिणामकारक असा “फ्लश सेव्ह वॉटर अभियान” हा उपक्रम उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आला असून, याची सुरुवात पिंपरी-चिंचवड येथील पारस रिवेरा सोसायटीत करण्यात आली आहे. पाणी बचतीबाबत पुढाकार घेऊन सर्व सामान्य नागरिकांमध्ये पाणी वापराबाबत जाणीव जागृती निर्माण करणे हा त्यामागे मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमांतर्गत घरातील टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये एक लिटर पाण्याने भरलेली प्लास्टिकची बाटली ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे प्रत्येक फ्लशवेळी साधारण एक लिटर पाणी कमी वापरले जाते आणि मोठ्या प्रमाणावर पाणी बचत साध्य होते.
पारस रिवेरा सोसायटीतील ४० फ्लॅट्समध्ये हा उपक्रम राबविण्यात आला आहे. प्रत्येक फ्लॅटमध्ये सरासरी ४ सदस्य आणि प्रत्येक सदस्य दिवसातून किमान ४ वेळा फ्लशचा वापर करतो, असे गृहीत धरल्यास प्रत्येक फ्लशमागे १ लिटर बचत याप्रमाणे दररोज ६४० लिटर पाणी बचत होणार आहे. याचा अर्थ, केवळ एका सोसायटीतच दररोज ६४० लिटर पाण्याची बचत होत असून, महिन्याभरात ही बचत सुमारे १९,२०० लिटर इतकी होते. अशा प्रकारे हा छोटासा बदल मोठ्या प्रमाणावर जलसंधारणास हातभार लावत आहे.
या उपक्रमामागील संकल्पना विशद करताना, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका तसेच उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, “पाणी हा अत्यंत मौल्यवान आणि मर्यादित स्रोत आहे. ‘फ्लश सेव्ह वॉटर अभियान’ ही संकल्पना अगदी सोपी असून, प्रत्येक नागरिकाने स्वतःहून अशा छोट्या उपाययोजना केल्यास मोठ्या प्रमाणावर पाणी बचत शक्य आहे. समाजातील प्रत्येक घटकाने यामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. हा उपक्रम केवळ एका सोसायटीपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात राबवण्याचा आमचा मनोदय आहे.”
उन्नती सोशल फाउंडेशनच्या या अभिनव उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती निर्माण होत असून, भविष्यात अधिकाधिक सोसायट्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
पाणी बचतीच्या या उपक्रमात प्रत्येक नागरिकाला प्रोत्साहन पर प्रमाणपत्र आणि सोसायटीला डस्टबीन देण्यात येणार असल्याची माहिती उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांनी दिली.



