spot_img
spot_img
spot_img

पुणे जिल्हा परिषदेला १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांकाचा मान; सेवाकर्मी प्लस कार्यक्रमातही प्रथम स्थानी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मुख्यमंत्री यांच्या१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या मूल्य मापनात पुणे जिल्हा परिषदेला २०० पैकी १९६.२५ गुण प्राप्त करुन राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे; सेवाकर्मी कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदेची ‘प्रथम’ क्रमांकाने निवड झाली आहे.

आज मुंबई येथील सह्याद्री सभागृहात पार पडलेल्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

मुख्यमंत्री यांच्या१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये सात महत्त्वाच्या घटकांवर- कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमता व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर तसेच भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड करण्यात आली.
श्री. गजानन पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून जिल्हा परिषदेने डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात अभिनव उपक्रम राबवून नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक व जलद सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेकडून Integrated Works Management System (IWMS), ‘स्पंदन’, ई-लॉटरी, System of Pension Illustration (SOPI), क्यूआर कोड आधारित कर संकलनप्रणाली यांसारख्या नाविन्यपूर्ण प्रणाली विकसित करण्यात आल्या असून, यामुळे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक झाले आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ हे द्विभाषिक, सुरक्षित व सुलभ असून नागरिकांना सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते. ‘आपले सरकार’ प्रणालीत १०० टक्के सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ई-ऑफिस प्रणालीमुळे कागदविरहित प्रशासनाला गती मिळाली असून हजारो नस्ती जलद निकाली काढण्यात आल्या आहे. तसेच इंटिग्रेटेड स्मार्ट डॅशबोर्डद्वारे डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया सक्षम झाली आहे.

‘Pune ZP Samvaad’ या व्हॉट्सअॅप AI चॅटबॉटद्वारे नागरिकांना २४x७ माहिती व सेवा मिळत आहेत. एआय, ब्लॉकचेन आणि जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करून मालमत्ता व्यवस्थापन, आरोग्य सेवा व विकास नियोजन अधिक प्रभावी करण्यात आले आहे.

सेवाकर्मी कार्यक्रमातही विशेष कामगिरी

सेवाकर्मी कार्यक्रमामध्ये ‘विशेष प्रशंसनीय’ म्हणून निवड होणे ही जिल्हा परिषदेच्या सेवा गुणवत्ता, नागरिक समाधान, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि डिजिटल सेवा विस्ताराची पावती मानली जात आहे.
१५० दिवसांच्या कार्यक्रमातील यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमाच्या सादरीकरणात व सर्व घटकांच्या एकत्रीकरणात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल सामान्य प्रशासन विभाग व त्याच्या टीमचेही त्यांनी अभिनंदन केले.

श्री. गजानन पाटील: मुख्य कार्यकारी अधिकारी: ‘डिजिटल प्रशासन ही काळाची गरज आहे. पुणे जिल्हा परिषद नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासवासाठी सतत प्रयत्नशील राहील आणि राज्यातच नव्हे तर देशातही एक आदर्श मॉडेल म्हणून उभी राहील.’

श्री वीरधवल जगदाळे, अध्यक्ष जिल्हा परिषद: “पुणे जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा सन्मान केवळ गुणांचा नाही, तर नागरिककेंद्रित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशासनाच्या आपल्या वचनबद्धतेचा गौरव आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत समन्वयाने काम करून हा माव मिळवला आहे. भविष्यातही नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध राहील.”

श्री. विवेक वळसे पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद: “पुणे जिल्हा परिषदेने ई-गव्हर्नन्स क्षेत्रात राज्यात प्रथम क्रमांक मिळवणे ही अत्यंत अभिमानाची व कौतुकास्पद बाब आहे. जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. या सामूहिक प्रयत्नांमुळे नागरिकांना अधिक पारदर्शक, जलद आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याची दिशा अधिक मजबूत झाली आहे.”

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!