पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
रावेत परिसरातील पुनावळे येथील बांधकाम साईटवर सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कॉन्ट्रॅक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुनावळे येथील पुनेविले कन्स्ट्रक्शन साईटवर उत्पल मनीकांत अधिकारी (वय ४५) हे सेंट्रींगचे काम करत असताना उंचावरून खाली पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
तपासात समोर आले की, साईटवरील कॉन्ट्रॅक्टर पंकज मंडल यांनी कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली सेफ्टी जाळी, सुरक्षा जॅकेट व इतर साधनांची योग्य व्यवस्था केली नव्हती. सुरक्षेची जबाबदारी असूनही निष्काळजीपणा केल्याने हा अपघात घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.



