spot_img
spot_img
spot_img

झोपडपट्टी सेवाकराच्या माध्यमातून ९७ लाख ३५ हजार रुपयांची वसुली

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १७ एप्रिल २०२५ ते २७ मार्च २०२६ या कालावधीत ९७ लाख ३५ हजार ६६० रुपयांचा झोपडपट्टी सेवाकर वसूल झाला आहे. चालू आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२६ रोजी संपणार असून, तोपर्यंत नागरिकांच्या सोयीसाठी झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे कार्यालय साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहे. सेवाकर भरणा सुलभ व्हावा आणि नागरिकांची गैरसोय टळावी यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तरी झोपडपट्टीवासीयांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपला सेवाकर तात्काळ भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली करदात्यांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने झोपडपट्टी सेवाकर भरण्याची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.

चालू आर्थिक वर्षातील झोपडपट्टी सेवाकर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विभागाकडून विशेष नियोजन करण्यात आले असून, नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन स्वरूपात सेवाकर भरता येणार आहे. तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सेवाकर भरण्यासाठी विभागाचे कार्यालय सुरू राहणार आहे, अशी माहिती उपायुक्त अण्णा बोदडे यांनी दिली आहे

असा भरा ऑनलाइन सेवाकर

  • ज्या नागरिकांना पिंपरी चिंचवड महापालिकेकडून बिल मिळाले आहे, ते नागरिक सदर बिलाचा भरणा घरबसल्या ऑनलाइन करू शकतात.
  •  तुम्हाला मिळालेल्या बिलाच्या खालच्या उजव्या बाजूस दिलेला क्यूआर कोड (QR Code) मोबाईलद्वारे स्कॅन करा.
  •  क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तुमचे नाव व बिलासंबंधी इतर संबंधित माहिती स्क्रीनवर दिसेल. कृपया माहिती तपासून घ्या.
  •  माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर, त्याखालील “Pay Bill Here” या बटणावर क्लिक करा.
  •  UPI / Credit Card / Debit Card / Net Banking / Digital Wallet यांपैकी कोणत्याही पर्यायाचा वापर करून बिलाचा भरणा पूर्ण करा.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी सेवाकर वसुलीत झालेली ९५ लाखांहून अधिकची वसुली ही सकारात्मक बाब आहे. नागरिकांना अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देत कर भरणा सुलभ व्हावा, यासाठी साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. झोपडपट्टीवासीयांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपला सेवाकर वेळेत भरावा आणि शहराच्या विकासात सहकार्य करावे.
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका

झोपडपट्टी सेवाकर वसुलीमध्ये पारदर्शकता आणि सुलभता यावर विशेष भर देण्यात आला आहे. ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी शेवटच्या क्षणाची गर्दी टाळून उपलब्ध सुविधांचा लाभ घेत वेळेत सेवाकर भरावा.
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!