शबनम न्यूज | प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आज राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार मा. श्री. प्रकाशजी आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आमदार सुनील शेळके उपस्थित होते.
बैठकीपूर्वी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी लोणावळा उपजिल्हा रुग्णालयाच्या सुरु असलेल्या इमारतीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि कामाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून लवकरात लवकर रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित बैठकीत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे, औषधांचा पुरवठा, अद्ययावत वैद्यकीय उपकरणे तसेच प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मावळमधील दुर्गम भागातील नागरिकांना तातडीने उपचार मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही विशेष भर देण्यात आला.
मावळ तालुक्यात दोन उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरी मिळवून देण्यात आमदार सुनील शेळके यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या प्रकल्पांमुळे लोणावळ्यासह खेडोपाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गोरगरीब जनतेला मोफत आणि दर्जेदार उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, ही रुग्णालये लवकरात लवकर सुरु करण्याची मागणीही होत आहे.
एकूणच, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमुळे मावळ तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेला नवे बळ मिळत असून, नागरिकांसाठी ही एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.



