शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पिंपळे निलख येथील मुळा नदी पात्रातून नदी सुधार प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या विरोधात रविवारी (दि.27) आंदोलन करण्यात आले. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी मुळा नदीकाठी आंदोलकांची भेट घेतली. नदी सुधारच्या नावाखाली वृक्षतोडीबाबत पर्यावरण प्रेमींनी बनसोडे यांना माहिती दिली. त्यावर अण्णा बनसोडे यांनी नदी सुधार प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्याच्या सूचना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिल्या आहेत.
पिंपरी चिंचवडसह पुण्यातील 100 पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटनांनी महापालिकेच्या नदी सुधार प्रकल्पाविरोधात दंड थोपटले आहे. या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी नदीकाठी, नदीसाठी आंदोलनाअंतर्गत रविवारी (दि.27) पिंपले निलख येथील शहिद अशोक कामठे उद्यान ते मुळा नदीकाठापर्यंत पदयात्रा काढण्यात आली होती. नदीकाठी पोहोचल्यानंतर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना व वृक्षतोडीमुळे गतप्राण झालेली झाडे, अधिवास नष्ट झाल्यामुळे प्राण गमावलेल्या पशु-पक्ष्यांना देखील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी नदी संरक्षणाची प्रतिज्ञा घेतली. नदी बचाव विषयावर लघुनाटिका सादर करण्यात आली.
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. पर्यावरण प्रेमींशी चर्चा करून नदी पात्राची बनसोडे यांनी पाहणी केली. नदी सुधार योजनेच्या नावाखाली होत असलेली बेकायदेशीर वृक्षतोड चुकीची आहे. नदीकाठी भराव टाकल्यामुळे नदीचे पात्र अरुंद होत आहे, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. आंदोलकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर नदी सुधार प्रकल्पाचे काम तुर्तास स्थगित करण्याची सूचना बनसोडे यांनी महापालिाक आयुक्तांना दिली.
या कामाची चौकशी करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यानंतर नदी सुधार प्रकल्पाबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन अण्णा बनसोडे यांनी दिले. शहरात सातत्याने बेकायदेशीरपणे वृक्षतोड होत असून अनेक प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे देखील दाखल झाल्याची बनसोडे यांना माहिती देण्यात आले. त्याबाबत बोलताना बनसोडे म्हणाले, अवैधपणे वृक्षतोड करून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. त्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या जातील.