spot_img
spot_img
spot_img

दापोडीत दहशत! सहा जणांचा हल्ला; लोखंडी रॉड, बिअर बाटल्यांनी मारहाण – खुनाचा प्रयत्न

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

दापोडी परिसरातील जयभीम नगर येथे जुन्या वादातून सहा जणांनी एकत्र येत तरुणांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २५ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास जयभीम नगर, हॉली क्रॉस चर्चजवळ घडली. याप्रकरणी महेश पवन गुळवे (वय २२, रा. दापोडी) यांनी फिर्याद दिली आहे.

चार महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाची खुन्नस मनात ठेवून आरोपी सनी गजभिव, नन्या उर्फ जयप्रकाश पंडीत, संदेश गजभिव, रोहन बनसोडे, डेविड उर्फ मोन्या पाटोळे व प्रथमेश चलवारे यांनी एकत्र येत बेकायदेशीर जमाव जमवला. त्यांनी हातात लोखंडी रॉड, बांबू, सिमेंटचे गट्टू व बिअरच्या बाटल्या घेत फिर्यादी व त्याचा मित्र आकाश पिंजन यांच्यावर हल्ला चढवला.

या हल्ल्यात आरोपींनी आकाश पिंजन याला जमिनीवर पाडून गळा दाबण्याचा प्रयत्न केला, तसेच सर्व आरोपींनी मिळून दोघांच्या डोक्यावर व शरीरावर गंभीर मारहाण केली. या वेळी साहील लांडगे व रुपेश कांबळे यांनाही बेदम मारहाण करून जखमी करण्यात आले.

या प्रकरणी दि. २६ मार्च रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी क्रमांक २ ते ६ यांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेमुळे दापोडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा प्रकारच्या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!