पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
चिखली परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या गॅस रिफिलिंग करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या प्रकाराचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत आरोपीला अटक करण्यात आली असून धोकादायक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८.२५ वाजण्याच्या सुमारास मोरेवस्ती, चिंचेचा मळा, चिखली येथील रोहीत गॅस सर्व्हिस येथे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे पोलीस शिपाई समीर लक्ष्मण रासकर यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी रोहीत प्रभाकर शिंदे (वय २७, रा. चिखली) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून नोझलच्या सहाय्याने गॅस काढून इतर सिलेंडरमध्ये भरत होता. हा प्रकार करताना कोणतीही सुरक्षितता उपाययोजना न करता, ज्वालाग्राही पदार्थ हाताळताना आवश्यक खबरदारी जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे १३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये लहान-मोठे भरलेले व रिकामे गॅस सिलेंडर, वजन काटा तसेच रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारे नोझल यांचा समावेश आहे.
या प्रकरणी आवश्यक वस्तू कायदा, स्फोटक पदार्थ अधिनियम तसेच इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अशा अवैध आणि धोकादायक व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



