spot_img
spot_img
spot_img

स्पा आडून सुरू होता देहव्यापार; पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक कारवाई, ३ महिलांची सुटका

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने शहरातील अवैध देहव्यापारावर मोठी कारवाई करत सम्राट चौक परिसरातील “रिच फील स्पा”वर छापा टाकून ३ पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी स्पा चालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या या स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २५ मार्च रोजी सायंकाळी छापा टाकण्यात आला. या कारवाईत स्पा चालक मयूर दिनेश मोहिते (वय २६, रा. दिघी) व व्यवस्थापक अक्षय महादेव सुतार (वय २६) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सुतार याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, २०२६ या वर्षात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने आतापर्यंत ८ आस्थापनांवर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. यामध्ये ६ स्पा/मसाज पार्लर व २ हॉटेल्सचा समावेश असून एकूण २० आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर १७ महिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.

याशिवाय, मागील तीन वर्षांत अवैध देहव्यवसाय चालवणाऱ्या २९ आस्थापनांवर एक वर्षासाठी बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिले आहेत. चालू वर्षातही ३ आस्थापनांवर अशी कारवाई करण्यात आली असून अन्य संशयित ठिकाणांची चौकशी सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त डॉ. शिवाजी पवार व सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते व त्यांच्या पथकाने केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!