spot_img
spot_img
spot_img

“नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन” – नगरसेवक संदीप वाघेरे यांचा इशारा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक २१ मधील १५ मीटर डी.पी. रस्त्यालगतच्या नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर राडारोडा टाकण्याच्या प्रकारावरून वातावरण तापले असून नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका प्रशासनावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. “नदीपात्राची उघडपणे होत असलेली नासधूस थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू,” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या मे. शुभम उद्योग या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांकडूनच नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामाचा राडारोडा टाकला जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग स्पष्ट दिसत असल्याने कंत्राटदाराची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

“ज्यांच्यावर प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी दिली, तेच नदीपात्र प्रदूषित करत असतील तर हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. हा सरळसरळ पर्यावरणाशी खेळ असून संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया संदीप वाघेरे यांनी व्यक्त केली.

या गंभीर प्रकाराबाबत पर्यावरण विभागाकडे तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही त्यांनी केला. “कुंपणच शेत खात असल्याची परिस्थिती निर्माण झाली असून अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात संगनमत असल्याचा संशय आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वाघेरे यांनी या प्रकरणी महापालिका आयुक्तांकडे पुराव्यासह ई मेल द्वारे तक्रार दाखल केली असून मे. शुभम उद्योग यांचा करार रद्द करणे, संबंधितांवर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणे आणि नदीपात्र तात्काळ पूर्ववत करणे, अशी ठोस मागणी केली आहे.

“जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर नागरिकांसोबत तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात महापालिका आयुक्त आता काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!