पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
मामुर्डी येथील बांधकाम साईटवर सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याने एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्च रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास कात्रज-मुंबई जुन्या महामार्गालगत असलेल्या एक्सेल टेक्नोव्हेंचर्स प्रा. लि. या साईटवर ही घटना घडली. कामगार फुंडी फुलचंद्र चौहान (वय अंदाजे ४०, मूळ रा. उत्तर प्रदेश) याला कोणतेही सुरक्षेसाठी आवश्यक साहित्य जसे हेल्मेट, सेफ्टी जॅकेट किंवा शूज न देता कामावर लावण्यात आले होते.
तसेच, साईटवरील धोकादायक भागात कोणतेही सुरक्षा बॅरिकेडिंग, जाळी किंवा इशारा फलक न लावल्याने चौहान हा पार्किंगमधील डक्टमधून थेट बेसमेंटमध्ये कोसळला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी गोकुळ कन्स्ट्रक्शनचे मालक राकेश गजेरा, लेबर कॉन्ट्रॅक्टर आकाश सोनपाळे आणि साईट सुपरवायझर देवेंद्र यादव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सावन वाघमारे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी दुगांवकर करत आहेत.



