spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडला ‘स्मार्ट आणि सुरक्षित’ शहर बनवण्यावर भर द्यावा – नगरसेविका अनुराधा गोरखे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्राचे औद्योगिक इंजिन आहे. या शहराचा विकास करताना केवळ रस्ते बांधणे पुरेसे नसून, नागरिकांना दर्जेदार आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षा मिळणे हा त्यांचा हक्क आहे, असे मत नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या.

यावेळी अनुराधा गोरखे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि नाविन्यपूर्ण सूचना प्रशासनासमोर मांडल्या.  

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची मागणी
शहरातील तरुण खेळाडूंना जागतिक स्तरावर संधी मिळावी, यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्वर्गीय अजितदादा पवार आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ’ उभारण्यात यावे, असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव त्यांनी मांडला. यामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्यासाठी विशेष ‘मार्गदर्शन केंद्रे’ सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच डिजिटल क्लासरूम्स आणि तज्ज्ञ शिक्षकांच्या उपलब्धतेवर भर दिला.

महिला सुरक्षा आणि उद्योजकता
शहरातील सार्वजनिक ठिकाणी ‘स्मार्ट लाइटिंग’ आणि सीसीटीव्हीचे जाळे अधिक सक्षम करून महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच, महिला बचत गटांना बळ देण्यासाठी विशेष ‘महिला उद्योजकता निधी’ उभारण्याची मागणी केली. महानगरपालिका आर्थिक कठीण परिस्थितीतून जात असताना अनावश्यक आणि दिखाऊ प्रकल्पांना कात्री लावून, प्रत्यक्ष गरजेच्या कामांना प्राधान्य द्यावे, असे नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी सुचवले. जुन्या मालमत्तांच्या देखभालीसाठी स्वतंत्र ‘देखभाल निधी’ असावा, जेणेकरून कामाचा दर्जा टिकून राहील.

पर्यावरणपूरक आणि डिजिटल प्रशासन
वाढत्या प्रदूषणावर उपाय म्हणून शहरात ‘मिनी फॉरेस्ट’ विकसित करणे आणि ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यावर त्यांनी भर दिला. तसेच, नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेचे कामकाज १००% डिजिटल आणि पेपरलेस करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.

हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांची मांडणी नसून, तो शहराच्या भविष्याचा आराखडा आहे. पिंपरी-चिंचवडला एक आदर्श आणि सर्वसमावेशक शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

– अनुराधा गोरखे, नगरसेविका

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!