पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब
चाकण परिसरात भरधाव वेगात धावणाऱ्या टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर पत्नी व लहान मुलगा गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी चालक फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८:३० वाजण्याच्या सुमारास वाकी भाम (ता. खेड) येथील तुळशी हॉटेलसमोर नाशिक-पुणे महामार्गावर हा अपघात झाला. फिर्यादी महिला आपल्या पती हेमंत साबळे व मुलगा हिमांशु (वय ६) यांच्यासह अॅक्टिवा (क्र. MH 14 JJ 4336) दुचाकीवरून खेडकडून चाकणकडे येत होते.
त्याचवेळी पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या टाटा टेम्पो (क्र. MH 14 HU 5942) चालक आरोपी राजन संजय जाधव (रा. राजगुरूनगर, ता. खेड) याने वाहन भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात हेमंत साबळे यांचा मृत्यू झाला, तर फिर्यादी महिला व त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २६८/२०२६ अन्वये बीएनएस कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ड), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास श्रेणी पोउपनि बुरुड करत असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.



