पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब
दापोडी परिसरात ईद निमित्त लावलेल्या स्पीकरच्या पार्श्वभूमीवर जुन्या वादातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९:१५ वाजण्याच्या सुमारास किनारा हॉटेलजवळ, पवार वस्ती, दापोडी येथे ही घटना घडली. फिर्यादी तौहीद तस्दीक अली खान (वय १५, रा. दर्गा वसाहत, खडकी) हा आपल्या नातेवाईकांसह ईद निमित्त लावलेले स्पीकर पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेला होता.
यावेळी आरोपी सुफियान नौशाद अन्सारी याच्या बोलावण्यावरून फिर्यादी तेथे पोहोचला असता, जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी आझाम खान, सुफियान अन्सारी तसेच त्यांचे साथीदार शिफ्टेन खान व उमर (पूर्ण नाव अज्ञात) यांनी फिर्यादीवर हल्ला चढवला. आरोपींनी फिर्यादीच्या कपाळावर लोखंडी कड्याने वार केला तसेच डोक्याच्या मागील भागावर लोखंडी कोयत्याने प्रहार करून त्याला गंभीर जखमी केले.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जखमी मुलावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५), आर्म अॅक्ट कलम ४(२५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास पोउपनि पवळे करत असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथके रवाना करण्यात आली आहेत.



