शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून तो तात्काळ सुरळीत करण्याची मागणी नगरसेविका संगीता नानी ताम्हाणे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी लेखी निवेदन देत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
नगरसेविका ताम्हाणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांकडून वारंवार पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून या परिसरात पाण्याची समस्या अधिक तीव्र झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून प्रभागातील पाणीपुरवठा नियमित आणि सुरळीत करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच समस्या लवकरात लवकर सोडवली नाही तर स्थानिक नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही तर नागरिकांसह आम्हालाही आंदोलनात सहभागी व्हावे लागेल. आंदोलनादरम्यान प्रशासन किंवा अधिकाऱ्यांसोबत काही अप्रिय घटना घडल्यास त्याची जबाबदारी आमची राहणार नाही, असा इशाराही नगरसेविका संगीता ताम्हाणे यांनी दिला आहे.
प्रभागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.



