पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
हिंजवडी परिसरातील मारुंजी येथे खोली रिकामी करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी (दि. २२ मार्च २०२६) सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास मारुंजी येथील दिनेश चव्हाण यांच्या चाळीत घडली. याबाबत विनोद किन्नु रॉय (वय ३९, सध्या रा. मारुंजी, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीच्या ओळखीचा जुना कामगार असलेला आरोपी बिकारीकुमार (रा. मारुंजी रोड परिसर) याला रूम रिकामी करण्यास सांगितल्याचा राग मनात धरून त्याने फिर्यादीशी वाद घातला. यानंतर आरोपीने शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच, फिर्यादीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याला गंभीर जखमी केले.
यावरच न थांबता आरोपीने कटरसारख्या धारदार शस्त्राने फिर्यादीच्या छातीवर व डाव्या हातावर वार करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १०९, ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साळे हे करत आहेत.



