spot_img
spot_img
spot_img

निगडीत पार्किंगमध्ये कोयत्याचा धुमाकूळ; तिघांवर वार, परिसरात दहशत

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

निगडीतील सम्राट हाउसिंग सोसायटी परिसरात किरकोळ वादातून हिंसक वळण घेत कोयत्याने हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तिघे जखमी झाले असून आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिला आरोपीसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी (दि. २२ मार्च २०२६) पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास निगडीतील ओटास्कीम परिसरातील सम्राट हाउसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडली. याबाबत निखिल लक्ष्मण सोनवणे (वय २५, रा. निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी आपल्या मित्रांसोबत – अनिकेत दाडगे आणि अमोल क्षीरसागर – पार्किंगमध्ये गप्पा मारत उभे असताना आरोपी जयदीप लोखंडे याने अनिकेत दाडगे यांचा चष्मा काढला. यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. आरोपीच्या आईने दाडगे यांचा चष्मा तोडला, तर अमोल क्षीरसागर यांनाही मारहाण करण्यात आली.

प्रकरण शांत करण्यासाठी फिर्यादीचे आई-वडील मध्यस्थी करण्यासाठी गेले असता, आरोपी जयदीप लोखंडे, त्याचे वडील दिलीप लोखंडे आणि आई या तिघांनी मिळून त्यांनाही शिवीगाळ व मारहाण केली.

दरम्यान, संतप्त झालेल्या आरोपी जयदीप लोखंडे याने घरातून लोखंडी कोयता आणून “तुम्हाला आता खलासच करतो” अशी धमकी देत उपस्थितांवर जीवघेणे वार केले. या हल्ल्यात अनिकेत सोनवणे (चुलत भाऊ) यांच्या डाव्या मनगटाला, फिर्यादी निखिल सोनवणे यांच्या उजव्या खांद्याला आणि अनिकेत दाडगे यांच्या हाताला दुखापत झाली.

घटनेदरम्यान परिसरातील नागरिक भांडण सोडवण्यासाठी धावून आले असता आरोपीने हवेत कोयता फिरवत “मध्ये कोणी पडू नका, नाहीतर मारून टाकेन” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली.

या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४/२५, २७, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम ३ व ७ आणि म.पो.का.क. ३७(१)(३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धुमाळ करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!