पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपळे सौदागर परिसरातील मिलिटरी लगत असलेला बॅक साईडचा रस्ता स्थानिक शेतकरी तसेच अल्को सोसायटी आणि साई पर्ल सोसायटीतील रहिवाशांमधील गैरसमजुतीमुळे अनेक दिवसांपासून बंद होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत होता.
या संदर्भात अल्को सोसायटी आणि साई पर्ल सोसायटीच्या कमिटी मेंबर्सनी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांची भेट घेऊन समस्या मांडली. समस्येची गांभीर्याने दखल घेत काटे यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत स्थानिक शेतकरी, सोसायटीचे कमिटी मेंबर्स, सभासद व नागरिक यांची संयुक्त बैठक आयोजित केली.
या बैठकीत सर्व संबंधितांशी सकारात्मक संवाद साधत प्रभावी मध्यस्थी करण्यात आली. त्यानंतर सर्वांच्या सहमतीने बंद असलेला रस्ता पुन्हा खुला करण्यात आला. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली ही समस्या मार्गी लागली असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी स्थानिक शेतकरी तसेच अल्को सोसायटी आणि साई पर्ल सोसायटीचे फ्लॅटधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्ता खुला झाल्यामुळे नागरिकांची वाहतूक सोयीची झाली असून परिसरातील दैनंदिन हालचालींना मोठा दिलासा मिळाला आहे.



