spot_img
spot_img
spot_img

समतेवर आधारित राष्ट्र निर्माणासाठी बहुजनांची एकजूट आवश्यक – माधवी जाधव

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय समाजव्यवस्थेत समता, न्याय आणि बंधुता यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ऐतिहासिक घटनांची आठवण करून देत, “समतेवर आधारित राष्ट्र निर्माण करण्यासाठी बहुजन समाजाने एकत्रित येणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन संविधानप्रेमी माधवी जाधव यांनी केले.

सन 1927 मध्ये रायगड जिल्ह्यातील महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्यावर पिण्याच्या पाण्यासाठी ऐतिहासिक सत्याग्रह केला होता. त्या काळात अस्पृश्य समाजाला या सार्वजनिक पाणवठ्यावरून पाणी पिण्यास मनाई होती. जनावरांना, पक्ष्यांना पाणी पिण्याची मुभा असताना मानवाला मात्र जातीय भेदभावामुळे पाण्यासाठी वंचित ठेवले जात होते. या अमानुष प्रथेविरुद्ध बाबासाहेबांनी उभारलेला हा लढा केवळ पाण्यासाठी नव्हता, तर तो मानवी हक्क आणि स्वाभिमानासाठीचा निर्णायक संघर्ष होता. या ऐतिहासिक घटनेला यंदा 99 वर्षे पूर्ण झाली.
याच पार्श्वभूमीवर मूलनिवासी मुस्लिम मंच संघटनाचे अध्यक्ष अंजुम इनामदार व जमातुल मुस्लिमीन महाड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्मृती त्या क्षणाची – त्या रोजा इफ्तारची’ हा समतावादी कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक चवदार तळे येथे आयोजित करण्यात आला. गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात असून, महाराष्ट्रभर सामाजिक ऐक्य आणि सलोख्याचा संदेश देण्याचे कार्य केले जात आहे. यंदाचा हा चौथा वर्षाचा कार्यक्रम विशेष उत्साहात पार पडला.

या वर्षीच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे संविधानप्रेमी माधवी जाधव यांच्या हस्ते पार पडलेला रोजा इफ्तार सोहळा. नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या सरकारी कार्यक्रमात नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न केल्याबद्दल जाहीरपणे निषेध नोंदवणाऱ्या ‘भीमाची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधवी जाधव यांनी आपल्या ठाम भूमिकेची पुनरावृत्ती करत समतेचा संदेश दिला. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील वकील व सचिव काझी हैदर यांचे तेरावे वंशज काझी मुश्ताक यांना खजूर देऊन रोजा इफ्तार करण्यात आला, ज्यामध्ये शेकडो मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला.

आपले विचार व्यक्त करताना माधवी जाधव म्हणाल्या, “इतिहास साक्षी आहे की ज्या तळ्यावर जनावरांना पाणी पिण्याची मुभा होती, त्याच ठिकाणी दलित समाजाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा अन्याय मोडून काढत समतेचा मार्ग दाखवला. मात्र आजही काही मनुवादी विचारसरणीचे लोक समाजात विद्वेष पसरवत आहेत. अशा मानसिकतेचा ठामपणे विरोध होणे आवश्यक आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “मुस्लिम समाजाने कधीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध केला नाही. उलट प्रत्येक ऐतिहासिक टप्प्यावर त्यांनी बाबासाहेबांना साथ दिली. महाड सत्याग्रह असो किंवा मनुस्मृती दहनासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रसंग – फतेह खान परिवाराचा सहभाग याचे ज्वलंत उदाहरण आहे. तसेच 13 ऑक्टोबर 1949 रोजी मौलाना हसरत मोहनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीतील संसद भवनात एकत्र येऊन केलेला रोजा इफ्तार हा सामाजिक ऐक्याचा अद्वितीय संदेश देणारा प्रसंग होता. पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम समाजाने बाबासाहेबांना लोकसभेत पाठवण्यासाठी दिलेले भरघोस समर्थनही याचीच साक्ष देते.”

“समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित राष्ट्र उभारण्यासाठी सर्व बहुजन समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे,” असा ठाम संदेश त्यांनी “रोजा इफ्तार” कार्यक्रम मध्ये उपस्थित हजारो नागरिकांना दिला.

या कार्यक्रमाला पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर काझी हैदर यांचे तेरावे वंशज काझी मुश्ताक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकचे व्यवस्थापक प्रकाश जमदाडे, जमातुल मुस्लिमीन मोहल्ला चॅरिटेबल ट्रस्ट. कातारी, पानसरे, देशमुख मोहल्ला महाड रायगड. अध्यक्ष मोहम्मद अली चिपळूणकर, उपाध्यक्ष हनीफ कातारी, सलीम देशमुख, फयाज पठाण, गुलाम पानसरे, महाज चिपळूणकर, यासीर चिपळूणकर,
सामाजिक कार्यकर्ते अनंत कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, परस्पर सन्मान आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश पुन्हा एकदा ठळकपणे मांडण्यात आला.

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!