spot_img
spot_img
spot_img

थेरगावच्या विद्यार्थिनीची कला झळकली; शिक्षणमंत्र्यांकडून विशेष कौतुक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

थेरगाव येथील पीएम श्री माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कु. सना राम गजबर हिने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे रेखाटलेले सुंदर छायाचित्र भेट दिल्यानंतर मंत्री महोदयांनी तिचे तोंडभरून कौतुक केले. या प्रसंगामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने एस.पी. कॉलेज, पुणे येथे राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणामध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे १२ हजार मुलींना स्वसंरक्षण आणि जीवन कौशल्य विषयक मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना विद्यार्थिनी सना गजबर हिने स्वतः रेखाटलेले त्यांचे आकर्षक छायाचित्र भेट दिले. विद्यार्थिनीच्या चित्रकलेतील बारकावे आणि तिची कला पाहून मंत्री भुसे यांनी विशेष कौतुक करत तिचे अभिनंदन केले आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाद्वारे मुलींमध्ये आत्मविश्वास, स्वसंरक्षणाची जाणीव आणि जीवन कौशल्य विकसित करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. विविध शाळांमधील विद्यार्थिनींनी या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

थेरगाव येथील पीएम श्री माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी सना गजबरच्या या यशामुळे शाळेचे नावही उज्ज्वल झाले असून शिक्षक व पालकांनी तिचे अभिनंदन केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!