पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब
पिंपळे गुरव परिसरात बांधकाम साहित्याच्या व्यवहारातून तब्बल ४४ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून सांगवी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याप्रकरणी अरुण श्रीपती पवार (वय ४७, रा. वैष्णवी प्राईड, गुलमोहर कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार गिरीश धनराज भट्टेवार (वय ४७, रा. काशिद पार्क, पिंपळे गुरव) याच्याविरुद्ध बीएनएस कलम ३१६(२), ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या ‘बालाजी सेंटरिंग कन्स्ट्रक्शन’ कंपनीकडून २६५१ प्लेट्स व १३०५ प्रॉप्स हे बांधकाम साहित्य दरमहा भाड्याने घेतले होते. मात्र, गेल्या नऊ महिन्यांपासून भाडे न देता तसेच साहित्य परत करण्यास टाळाटाळ करत आरोपीने फिर्यादीची फसवणूक केली.
वारंवार मागणी करूनही साहित्य परत न करता आणि थकीत रक्कम न भरता आरोपीने एकूण ४४.७८ लाख रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी सांगवी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.



