शबनम न्यूज | प्रतिनिधी
फिरण्यासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणांच्या एका मोटारीला राजस्थानमधील कोटा शहरात अपघात झाला असून त्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मतदारसंघात ही घटना घडली आहे. त्यांच्या सचिवाशी माझी चर्चा झाली आहे. तिघांच्या मृतदेहाचे पोस्ट मार्टम झाले असून नातेवाईक तिथे पोहोचले आहेत. गुरुवारी सकाळी मृतदेह शहरात आणण्यात येणार आहेत, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरातील 14 तरुणांचा ग्रुप मोटारीने फिरण्यासाठी परराज्यात गेला आहे. या तरुणांच्या एका मोटारीचा राजस्थानमधील कोटा शहरात बुधवारी पहाटे अपघात झाला. त्यात तिघांचा झोपतेच मृत्यू झाला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या सचिवाने मला संपर्क साधून या अपघाताची माहिती दिली. माझी त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. संपूर्ण मदत करण्यात आली आहे. तिघांच्या मृतदेहाचे पोस्ट मार्टम झाले असून नातेवाईक तिथे पोहोचले आहेत. मृतदेह आणण्यासाठी इअर ॲम्बुलन्स उपलब्ध झाली आहे. पण, 300 किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे मृतदेह विमानाने की ॲम्बुलन्सने आणायचे याबाबाब कुटुंबातील सदस्यांशी चर्चा सुरू आहे, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
आठ दिवसांपूर्वी लेहमध्ये अडकले होते
लेह-लडाखच्यामध्ये कारगिल येथे हे पर्यटक आठ दिवसांपूर्वी अडकले होते. बर्फवृष्टी झाल्याने रस्ते बंद होते. त्यामुळे चार दिवस ते एकाच ठिकाणी अडकले होते. त्यांना कोठेही जाता येत नव्हते. त्यावेळीही त्यांचा फोन आला होता. बीएसएफच्या कमांडरशी संवाद साधून या पर्यटकांना तेथून सोडले होते, असेही खासदार बारणे यांनी सांगितले.



