spot_img
spot_img
spot_img

कोरियन उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणुकीस सकारात्मक – एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू

शबनम न्यूज | प्रतिनिधी

कोरियन उद्योजक आणि गुंतवणूक प्रतिनिधी हे महाराष्ट्र आणि विशेषतः पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसर ऑटोमोबाईल व उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करून उद्योग उभारणी करण्यास सकारात्मक आहेत. पुणे औद्योगिक परिसर कोरियन गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र म्हणून पुढे येत आहे. या परिसंवादात ४० पेक्षा जास्त कोरियन कंपन्यांनी आगामी काळात जमीन खरेदीसाठी उत्सुकता दर्शवली आहे. तसेच एमआयडीसी च्या धोरणाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) कौशल्यसंपन्न मनुष्यबळ, संशोधन सहाय्य आणि नवोन्मेषी उपाययोजनांद्वारे या परिसंस्थेला सक्रिय योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टने “पीसीयू – कोरिया फॅसिलिटेशन सेंटर” ची स्थापना केली आहे, हे केंद्र भारत – कोरिया उद्योग, व्यवसायाला चालना देण्यास उपयुक्त ठरेल. आता लवकरच याच्या समन्वयासाठी एक खिडकी योजना सुरू करू असे प्रतिपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू (आयएएस) यांनी केले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि कोरिया एसएमई अँड स्टार्टअप्स एजन्सी (कोरिया एसएमइज अँड स्टार्टअप एजन्सी (कॉस्मे – KOSME) आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे “पीसीयू – कोरिया फॅसिलिटेशन सेंटर” यांच्या वतीने पुणे, हॉटेल ऑर्चिड येथे सोमवारी (दि.१६ मार्च) संयुक्त परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पी. वेलरासु बोलत होते. यावेळी एमआयडीसीचे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राठोड, कोरिया प्रजासत्ताक महावाणिज्य दूत (मुंबई) यू डोंग वॉन, कॉस्मे संचालक ली जे क्युंग, पीसीइटी चे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयू नियामक मंडळ सदस्य सचिन इटकर, पीसीयू औद्योगिक संबंध संचालक डॉ. प्रणव चरखा, ताराजीनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व पीसीयूच्या प्रा. युजिन हान, कॉस्मे उद्योजक प्रतिनिधी तसेच ह्युंदाई ग्लोविस, इलजिन ग्लोबल इंडिया, ह्योसंग ग्रुप, सेन्सरटेक इंडिया, डाँगक्वांग प्रिसिजन, टर्बोमॅक्स इंडिया, कॉमॉस इंडिया, हेउंगकूक इंडिया, साविल्स इंडिया यासह इतर अनेक कोरियन कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अनेक कोरियन कंपन्यांनी एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रामध्ये कारखाने उभारणी व गुंतवणुक प्रस्ताव दिले आहेत. अशा प्रकारचे संवाद सत्र दर तीन महिन्यांनी मुंबईतील कोरिया प्रजासत्ताकाचे वाणिज्य दूत, कोरियन उद्योग प्रतिनिधी आणि एमआयडीसीचे अधिकारी यांच्या समवेत आयोजित केले जाईल असेही एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू (आयएएस) यांनी सांगितले.
स्वागत, प्रास्ताविक करताना पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, भारत–कोरिया सहकार्यास नवे बळ देण्यासाठी “पीसीयू – कोरिया फॅसिलिटेशन सेंटर” स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या कोरियन कंपन्या, एमआयडीसी अधिकारी आणि विविध भागधारक यांना एका व्यासपीठावर आणण्यात पीसीयूने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
हे केंद्र भारत आणि कोरिया यांच्यातील उद्योग, कौशल्य विकास आणि संशोधन यांना जोडणारा दुवा म्हणून कार्य करणार आहे. या केंद्रामार्फत उद्योग सहकार्य, कौशल्य विकास आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या तीन प्रमुख क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. विद्यापीठ उद्योग, शिक्षण सहकार्य, इंटर्नशिप, संशोधन प्रकल्प आणि उद्योग संस्था संवाद उपक्रमांना चालना देण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच कोरियन भाषा कार्यक्रम आणि कॉस्मे संलग्न उपक्रमांद्वारे जागतिक संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू असल्याचेही डॉ. देसाई यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. युजिन हान आणि आभार डॉ. प्रणव चरखा यांनी मानले.
पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी कॉस्मे परिसंस्था सहभागी झालेल्या सर्व उद्योजक व प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!