spot_img
spot_img
spot_img

आयुक्त यांनी दुर्गादेवी टेकडीसह शहरातील विविध विभागांची केली पाहणी; कचरा व्यवस्थापन व आरोग्य सेवांचा घेतला आढावा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आज सकाळी दुर्गादेवी टेकडीसह शहरातील विविध भागांची पाहणी करत स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. कुदळवाडी, चिखली, पुनावळे, तळवडे, रुपीनगर आणि त्रिवेणी नगर या परिसरांमध्ये प्रत्यक्ष भेट देत त्यांनी कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची स्वच्छता तसेच नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांची स्थिती तपासली.

दुर्गा देवी टेकडी परिसराची पाहणी करताना आयुक्त यांनी तेथील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधांची स्थिती तपासली. तसेच परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचीही त्यांनी पाहणी केली. स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता, देखभाल आणि नागरिकांसाठी स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

दुर्गादेवी टेकडी हे ठिकाण शहराच्या वैभवात भर घालणारे ठिकाण असून अनेक नागरिक तेथे भेट देत असतात, त्यामुळे याठिकाणी नागरिकांना पर्याप्त सुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत. याठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पती आणि वृक्षांच्या प्रजातीही पाहायला मिळत असल्याने त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याबाबत देखील त्यांनी सूचना केल्या. शिवाय, त्यांनी तेथील नागरिकांशीही संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घेतले.

याशिवाय त्यांनी सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करत पाणी शुद्धीकरण प्रक्रियेची माहिती घेतली. तसेच निगडी येथील यमुनानगर आरोग्य कार्यालयाला भेट देत तेथील कामकाजाचा आढावा घेतला आणि कार्यालयातील दैनंदिन हजेरी नोंदवह्या तपासल्या. तसेच, सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेचे काटेकोर पालन करावे आणि नागरिकांना सेवा देताना कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

यावेळी सहाय्यक आरोग्याधिकारी महेश आढाव, मुख्य आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर, आरोग्य निरीक्षक रामचंद्र शिंगाडे, सहाय्यक आरोग्य निरीक्षक रवी रोकडे, आरोग्य मुकादम मल्लिकार्जुन कुरवार आदी कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, डॉ. सूर्यवंशी यांनी वॉर्डस्तरीय कामकाजाबाबत देखील सविस्तर माहिती घेतली. कचरा संकलनाची नियमितता, आरोग्य पथकांची उपस्थिती, तसेच क्षेत्रातील स्वच्छतेची अंमलबजावणी याबाबत कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन कामाची गुणवत्ता उंचावण्यावर भर देण्याबाबत सूचना केल्या.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!