पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
दापोडी परिसरातील अल्बन चौक, गुलाबनगर येथे एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणी दापोडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार तुकाराम चाराकटले (वय २४, रा. सिद्धार्थ नगर, दापोडी) हे १६ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजता दुचाकीवरून पाण्याचा जार घेण्यासाठी जात असताना, आरोपी रोहित उर्फ झुणझुण्या अशोक गुजरे (वय १९, रा. दापोडी गावठाण) याने मागून येत धारदार लोखंडी कोयत्याने त्यांच्या डोक्यावर जोरात वार केला.
या हल्ल्यात तुषार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



