शबनम न्यूज | प्रतिनिधी
राजगड तालुका येथील वेल्हे-नसरापूर मार्गवरील करंजावणे गावाच्या हद्दीत दुचाकी आणि रिक्षाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात पिता-पुत्रासह तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमींमध्ये दत्तात्रेय नथू कडू, त्यांचा मुलगा पप्पू दत्तात्रेय कडू तसेच सचिन सोपान पवार यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास दुचाकी (क्र. एमएच १२ झेडए ३४८३) आणि रिक्षा (क्र. एमएच १२ टियु ८६५७) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात मांगदरी (ता. राजगड) येथील दत्तात्रेय कडू आणि त्यांचा मुलगा पप्पू कडू यांना गंभीर दुखापत झाली. तसेच लाशिरगाव येथील सचिन पवार देखील गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सचिन पवार यांच्यावर नसरापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून कडू पिता-पुत्रावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाताची पुढील तपासणी स्थानिक पोलीस करत आहेत.



