शबनम न्यूज | प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त रहाटणी परिसरात महिलांसाठी पारंपरिक खेळ, मज्जा-मस्ती आणि धमाल यांचा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. नगरसेवक सागर खंडूशेठ कोकणे युवा मंच व स्वप्नशिल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रहाटणी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान, आकाशगंगा सोसायटीजवळ आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक सागर कोकणे यांच्या उपस्थितीत चिंचवड विधानसभा अध्यक्षा संगिताताई कोकणे, प्रियांकाताई सागर कोकणे तसेच वृषालीताई स्वप्नील कोकणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या वेळी विविध पारंपरिक खेळ, मनोरंजक स्पर्धा आणि मजेशीर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील मोठ्या संख्येने महिला भगिनींनी या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमाची रंगत वाढवली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत त्यांना स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. महिलांमधील एकोपा, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि स्पर्धांमध्ये दिसलेला उत्साह यामुळे रहाटणी परिसरात महिला दिनाचा जल्लोषपूर्ण माहोल निर्माण झाला. आयोजकांनी सर्व सहभागी महिला व उपस्थितांचे आभार मानले.



