spot_img
spot_img
spot_img

पुण्यात होणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची ISWAI तर्फे मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पारंपरिक भारतीय मातीवरील कुस्ती (मिट्टी-कुस्ती) आणि तिच्या ऐतिहासिक किताबांचे संरक्षण करण्यासाठी इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडिया (ISWAI)  कटिबद्ध आहे. ‘हिंद केसरी’, ‘भारत केसरी’ आणि ‘रुस्तम-ए-हिंद’,महाराष्ट्र केसरी’या प्रतिष्ठित किताबांच्या परंपरेचे जतन करण्यासाठी आवश्यक कायदेशीर पावले उचलण्यात आली असल्याचे सांगत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी  पुण्यात होणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची मागणी न्यायालयाकडे केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडिया (ISWAI) सरचिटणीस जनरल गौरव रोशन लाल सचदेवा,महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघ सचिव मोहन खोपडे, पै.ज्ञानसिंह शेरावत (ओलंपियन,अध्यक्ष तांत्रिक समिती),पै.नितीन बारणे (अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघ), पै.पोपट नलावडे (राष्ट्रीय खेळाडू),महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघ कार्याध्यक्ष प्रा.नितीन शिंदे आणि पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, १९५८ पासून कार्यरत असलेल्या ISWAI कडून देशभरातील कुस्तीपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देत पारंपरिक भारतीय कुस्तीचा वारसा जपण्याचे काम केले जात आहे. या ऐतिहासिक किताबांचे नाव व प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी त्यांची ट्रेडमार्क नोंदणीही करण्यात आली आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, भारतीय पारंपरिक कुस्तीच्या प्रसारासाठी त्यांच्या कार्याला United World Wrestling कडूनही मान्यता मिळाली आहे. या संस्थेने ISWAI ही भारतातील पारंपरिक कुस्तीचे प्रतिनिधित्व करणारी अधिकृत राष्ट्रीय संघटना आहे.

दरम्यान, महाराष्ट्र कुस्ती संघटना (Wrestling Association of Maharashtra) यांनी ISWAI आयोजित स्पर्धा व किताबांना “बोगस” म्हटल्याचा आरोप संघटनेने फेटाळून लावला आहे. अशा विधानांमुळे कुस्ती समुदायात संभ्रम निर्माण होत असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यासंदर्भात ISWAI चे सरचिटणीस गौरव सचदेवा आणि महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाचे सचिव मोहन खोपडे यांनी मिळून प्रस्तावित ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेविरोधात पुणे जिल्हा न्यायालय येथे स्थगिती व मनाई आदेशासाठी अर्ज दाखल केला आहे. ही स्पर्धा १८ ते २२ मार्च २०२६ दरम्यान वाघोली येथे आयोजित करण्यात आली आहे. ॲड. अभिषेक येंडे, ॲड. संजुक्ता डे, ॲड. राजसाहेब पंडितराव पाटील आणि ॲड. यश दिंडे यांच्या मार्फत ही याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ मार्च रोजी होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कुस्तीपटू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ISWAI ने केले आहे. तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पारंपरिक भारतीय कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी संघटना पुढे ही कार्यरत राहील, असा पुनरुच्चार पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी केला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!