शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात दि. १ एप्रिल २०२५ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत तब्बल ८०० कोटी ८४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद, कर संकलन विभागाचे नियोजनबद्ध कामकाज, विविध सवलतींची अंमलबजावणी तसेच कर भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन व ऑफलाइन सुविधांमुळे कर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. कर भरण्यास चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल महापौर रवि लांडगे यांनी सर्व करदात्यांचे आभार मानले आहेत. तसेच ज्या थकबाकीदारांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही, त्यांनी अभय योजनेचा लाभ घेऊन लवकरात लवकर मालमत्ता कर भरावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
थकबाकीदार नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेमार्फत अभय योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत थकीत मालमत्ता कराची रक्कम एकरकमी भरल्यास दि. १ मार्च २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत विलंब दंडाच्या रकमेवर तब्बल ९० टक्के सवलत देण्यात येत आहे. अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी अवघे १७ दिवस शिल्लक राहिले आहेत.
महापालिकेमार्फत नागरिकांना या योजनेची माहिती देण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असून अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात सध्या निवासी – बिगरनिवासी, औद्योगिक व इतर एकूण ७ लाख ३२ हजार मालमत्तांची नोंद असून त्यापैकी ५ लाख ७५ हजार ३२८ मालमत्ताधारकांनी आतापर्यंत मालमत्ता कराचा भरणा केला आहे. कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचे दिसून येत असून शहरातील नागरिकांकडून कर भरण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तसेच ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही, अशा थकबाकीदारांवर कर संकलन विभागामार्फत नियमानुसार जप्ती व नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
वाकड विभागीय कार्यालयांतर्गत सर्वात जास्त वसुली
कर आकारणी व कर संकलन विभागाची १ एप्रिल २०२५ पासून ते १३ मार्च २०२६ या कालावधीत वाकड विभागीय कार्यालयांतर्गत सर्वात जास्त वसुली झाली आहे. या कालावधीत या कार्यालयाने १०१ कोटी २१ लाख रुपयांची वसुली केली आहे. तर थेरगाव ८० कोटी ५६ लाख, चिखली कार्यालयाने ६६ कोटी ५४ लाख, किवळे ५५ कोटी ४६ लाख, कस्पटे वस्ती ५२ कोटी ३७ लाख, भोसरी ५१ कोटी ८५ लाख, चिंचवड ५० कोटी ७४ लाख, मोशी ५० कोटी ३४ लाख, पिंपरी वाघेरे ४५ कोटी ६४ लाख, सांगवी ४० कोटी १५ लाख, मनपा भवन ३७ कोटी ११ लाख, आकुर्डी ३६ कोटी ९ लाख, चऱ्होली ३१ कोटी ६१ लाख, फुगेवाडी दापोडी ३० कोटी ८३ लाख, दिघी बोपखेल २४ कोटी ९ लाख, तळवडे २१ कोटी ९ लाख, निगडी प्राधिकरण १७ कोटी ९९ लाख, पिंपरी नगर ७ कोटी १७ लाख.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मालमत्ता कर वेळेत भरून महापालिकेच्या विकासकामांना मोठा हातभार लावला आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि कर संकलन विभागाचे नियोजनबद्ध कामकाज यामुळे ८०० कोटींहून अधिक कर संकलन शक्य झाले आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांनीही अभय योजनेचा लाभ घेऊन थकीत कराची रक्कम भरावी आणि शहराच्या विकासात सहभागी व्हावे.
रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका.
महापालिकेमार्फत नागरिकांना कर भरण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच अभय योजनेअंतर्गत विलंब दंडावर ९० टक्के सवलत दिल्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. ज्यांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही त्यांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, अन्यथा नियमानुसार जप्ती व नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल.
*सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका



