तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी युनूस खतीब
पोलीस खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका कुटुंबाची तब्बल ६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आला आहे.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत.
याप्रकरणी अशोक बापुराव बटगी (वय ५८, व्यवसाय मजुरी, रा. झवेरी कॉलनी, लिलावती ग्रीन सोसायटी मागे, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार जितेंद्र रामचंद्र पिंगळे (वय ४०), एक महिला आरोपी व दिघु पिंगळे (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांच्या विरोधात गुन्हा क्रमांक ८५/२०२६ भा.न्या.सं. कलम ३१८ (४), ३५१ (२) व ३५१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी अशोक बटगी यांना आपली पोलीस महासंचालकांकडे ओळख असल्याचे सांगून त्यांच्या मुलगा प्रसाद याला पोलीस खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले.
त्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रसादच्या मोबाईलवरील गुगल पे क्रमांकावरून आरोपी जितेंद्र पिंगळे यांच्या गुगल पे क्रमांकावर एकूण ६ लाख रुपये घेतले.
नोकरी लावून देण्याचे आश्वासन पूर्ण न करता आरोपींनी फिर्यादींची फसवणूक केली. तसेच तुम्ही आमच्याविरोधात तक्रार केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवू व पैसेही मिळणार नाहीत, अशी धमकी दिली.
आरोपी दिघु पिंगळे यानेही फिर्यादीच्या मुलाला फोन करून पैसे मागितल्यास वडिलांना कामावरून काढून टाकू आणि सोसायटीमध्ये दिसू नका, अन्यथा वाईट परिणाम होतील अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील करीत आहेत.



