पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
तळेगाव दाभाडे : घरासमोर मंदिराजवळ बसलेल्या महिला व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून दगड मारल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली असून या प्रकरणी एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम ११०, ११५(२), ३५२, ३५१(२) अंतर्गत नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजता ही घटना कुंभारवाडी, शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे येथे घडली.
फिर्यादी महिला व त्यांची सासू सुमन दरेकर या घरासमोरील मंदिराजवळ बसलेल्या असताना आरोपी संतोष दगडू भेगडे (वय ४५, रा. शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी येऊन फिर्यादीला अश्लील शिवीगाळ केली.
यावेळी आरोपीने दगड मारल्यास एखाद्याचा जीव जाऊ शकतो हे माहिती असूनही दगड फेकून सुमन दरेकर यांच्या डाव्या चेहऱ्यावर मारून त्यांना जखमी केले.
तसेच फिर्यादीचे दिर हनुमता दरेकर यांना हाताने मारहाण करून “तुमचा सर्वांचा आज मर्डर करतो” अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दि.१३ मार्च २०२६ रोजी पहाटे १.२० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संतोष भेगडे याला पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरडकर करत आहेत.



