spot_img
spot_img
spot_img

पुतळ्याला नाही विरोध, पण गैरव्यवहाराला ठाम विरोध – सुलभा उबाळे यांचा इशारा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मोशी येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य पुतळा परिसरातील विकासकामांसाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर अनियमिततेचा संशय व्यक्त करत शिवसेना स्थायी समिती सदस्या सुलभा उबाळे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. पुतळ्याला किंवा परिसराच्या विकासाला आमचा अजिबात विरोध नसून, छत्रपती संभाजी महाराज हे देशाच्या अस्मितेचे प्रतीक असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

उबाळे म्हणाल्या की, पुतळा परिसरातील विद्युत कामे व सुशोभीकरणासाठी तब्बल ३२ कोटी ३४ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली असून ती ० टक्के दराने दाखल झाल्याचे दिसून येते. याशिवाय परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि इतर विद्युत विषयक कामांसाठी १८ कोटी ६६ लाख रुपयांच्या दोन स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या आहेत. या निविदांमध्ये संबंधित ठेकेदाराने सुमारे ७ टक्के दर दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.

ही कामे अत्यंत संवेदनशील स्वरूपाची असून निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात ‘रिंग’ झाल्याचा गंभीर संशय असल्याचे उबाळे यांनी नमूद केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाखाली राबविण्यात येणाऱ्या सुमारे ५० कोटी रुपयांच्या पुतळा विकासकामांमधून तब्बल १५ कोटी रुपयांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

त्यांनी पुढे सांगितले की, हीच कामे जर निकोप स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे सुमारे ३० टक्के कमी दराने झाली असती, तर महापालिकेचे किमान १५ कोटी रुपये वाचले असते. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सध्याची आर्थिक परिस्थितीही चिंताजनक असल्याचे सांगितले. चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पातील जवळपास ८० टक्के निधी हा प्रशासकीय काळात मंजूर झालेल्या प्रकल्पांवर खर्च होणार असून त्यामुळे नवीन विकासकामांसाठी निधी उपलब्ध होण्याची अडचण निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे; मात्र महाराजांच्या नावाखाली स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्यांना आमचा ठाम विरोध असेल, असा इशाराही त्यांनी दिला. या दोन्ही कामांची पत्रकारांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट होईपर्यंत निर्णय घेऊ नये, तसेच हे विषय पुढील सभेपर्यंत तहकूब ठेवावेत, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, या दोन्ही निविदांवरील विषय सध्या तहकूब ठेवण्यात आले असून, स्थायी समितीचे सभापती Abhishek Barne या प्रकरणावर पुढे काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!