पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
महाराष्ट्र शासनाने मोठा प्रशासकीय निर्णय घेत डॉ. विजय सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी (दि.११) याबाबत आदेश जारी केले.
सध्या कोकण विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ. विजय सूर्यवंशी यांची बदली करून त्यांची नियुक्ती पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त या रिक्त पदावर करण्यात आली आहे. हे पद अधिकालिक वेतन श्रेणीत उन्नत करून त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
शासनाच्या आदेशानुसार डॉ. सूर्यवंशी यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार अपर मुख्य सचिव (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क) यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री. श्रावण हर्डीकर यांच्याकडून तातडीने कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, नवीन पदावर रुजू झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी Supremo प्रणालीवर (ER Sheet मधील Posting कॉलममध्ये) रुजू अहवाल अद्ययावत करणे, तसेच कार्यभार हस्तांतरण व स्वीकृती करताना शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचेही निर्देश आदेशात नमूद करण्यात आले आहेत.
हा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी जारी केला असून संबंधित विभागांना याची प्रत पाठविण्यात आली आहे.



