शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (SBPIM), निगडी यांच्या वतीने “INSPIRE 2026” या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन दि. १३ व १४ मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे. परिषदेत “Responsible Business Innovation: Driving Change for Sustainable Global Future” या महत्त्वपूर्ण विषयावर देश-विदेशातील संशोधक, प्राध्यापक, उद्योगतज्ज्ञ व विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे.
या परिषदेस प्रमुख अतिथी म्हणून उद्योगतज्ज्ञ डॉ. प्रशांत पानसरे उपस्थित राहणार आहेत. परिषदेमध्ये भारतासह अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, फिलिपिन्स, थायलंड, लेबनॉन आणि दुबई आदी देशांतील संशोधकांचा सहभाग नोंदविण्यात आला आहे.
या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी एकूण ५३८ लेखकांनी नोंदणी केली असून सुमारे २४० संशोधनपर लेख विविध तांत्रिक सत्रांमध्ये सादर केले जाणार आहेत. व्यवस्थापन, शाश्वत विकास, जबाबदार व्यवसाय नवोन्मेष आणि डिजिटल परिवर्तन यांसारख्या विषयांवर परिषदेत सखोल चर्चा होणार आहे.
परिषदेसाठी संस्थेच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर तसेच शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. रूपाली कुदरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे. परिषद संयोजक म्हणून डॉ. दिलीप पवार, डॉ. योगेंद्र देवकर, डॉ. काजल माहेश्वरी आणि डॉ. संतोष शिंदे कार्यरत असून विविध शैक्षणिक व तांत्रिक सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे.
या परिषदेस पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार मा. ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा मा. पद्माताई भोसले, सचिव मा. विठ्ठल काळभोर, खजिनदार मा. शांताराम गराडे, ट्रस्टी मा. हर्षवर्धन पाटील तसेच कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी मार्गदर्शन केले असून या आंतरराष्ट्रीय परिषदेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आयोजकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या परिषदेमुळे व्यवस्थापन शिक्षण, संशोधन व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांना आंतरराष्ट्रीय पातळीवर विचारांची देवाणघेवाण करण्याचे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.



