spot_img
spot_img
spot_img

जुन्या संगीत नाटकांना नव्या पिढीतील तरुण प्रेक्षक निश्चित आहे – पद्मश्री नयना आपटे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

जुन्या संगीत नाटकांना नव्या पिढीचे तरुण प्रेक्षक मिळत नाहीत हे म्हणणे अजिबात योग्य नाही. त्यांना व्यासपीठ मिळवून दिले पाहिजे. याची प्रचीती सुमारे शंभर वर्षांच्या पूर्वीच्या संगीत ‘एकच प्याला’ नाटकाला झालेल्या प्रचंड गर्दीवरून दिसून येते. संगीत रंगभूमीची ही गौरवशाली परंपरा कायम पुढे जाण्यासाठी लोकाश्रय आहे, राजाश्रय आहे. आता आर्थिक सहाय्यही हवे असे उद्गार पद्मश्री ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांनी आज काढले. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान तर्फे त्यांना मनाचा ‘कोहिनूर नाट्यरत्न पुरस्कार’ कोहिनूर ग्रुपचे अध्य्श कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते समारंभ पूर्वक देण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठानच्या अध्यक्ष चारुशीला केळकर, उपाध्य्श व संयोजिका सुचेता अवचट, खजिनदार अशोक अवचट उपस्थित होते. प्रवेशद्वारापाशी अतिशय आकर्षक भव्य रांगोळी रेखाटण्यात आली होती.

पद्मश्री नयना आपटे म्हणाल्या की राम गणेश गडकरी यांच्या सर्व नाटकांमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली हे मी माझे भाग्य मानते. संगीत ‘एकच प्याला’ हे गडकऱ्यांचे नाटक, गडकऱ्यांची भाषा बोलायची म्हणजे फार कठीण आहे, वाचायची तर अधिकच कठीण आहे पण बोल्यानंतर सादर करण हे त्याहूनही कठीण आहे. संगीत नाटकांची परंपरा तरुण कलाकार पुढे नेत आहेत ही कौतुकाची बाब असून, प्रत्येक मराठी रसिक प्रेक्षकाने संगीत नाटके स्वतः बघावी व इतरांनाही बघण्यास प्रवृत्त करावे असे त्या म्हणाल्या.

कृष्णकुमार गोयल म्हणाले की स्वरराज छोटा गंधर्व यांच्या जयंतीदिनी ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांच्या अजरामर संगीत ‘एकच प्याला’ नाटकाचा प्रयोग पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीत हाऊसफुल होत आहे ही निश्चितच आनंदाची बाब आहे. यातील तरुण कलावंतांनी जिद्ध आणि निष्ठेने हे अवघड नाटक सादर केले त्यामुळे त्यांचे कौतुक करायला हवे. या संगीत नाटकातील संवाद आणि पदे ऐकताना अंगावर रोमांच उमटते. अशा संगीत नाटकांच्या अभिजात कलाकृतींना प्रोत्साहन देण्यासाठी कोहिनूर ग्रुप सदैव सहयोग देईल असे ते म्हणाले.

प्रारंभी संस्थेच्या उपाध्यक्षा व संयोजिका सुचेता अवचट यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानच्या अद्यक्ष चारुशीला केळकर यांनी आभार प्रदर्शन केले. यानंतर ‘संगीत एकच प्याला’ नाटकाचा प्रयोग सादर झाला. त्यास वरद रंगभूमीचा सहयोग लाभला. यावेळी सभागृह तुडुंब भरले होते. अभिनेते उदय लागू देखील यामध्ये सहभागी होते.

या संगीत नाटकात सन्मिता धापटे-शिंदे (सिंधू), अभिषेक अवचट (सुधाकर), चंद्रकांत मुळगुंदकर (तळीराम), पूजा पारखी (गीता), निलेश दातार (भगीरथ), सौरभ पाणदारे (रामलाल), डॉ. ऋतुपर्ण पिंगळे (पद्माकर) व अन्य बारा कलावंत सहभागी होते. संगीत दिग्दर्शन सुचेता अवचट यांनी केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!