१०५ व्या वर्षी अखेरचा श्वास; बंजारा समाजात शोककळा
शबनम न्यूज | प्रतिनिधी
बंजारा समाजातील ज्येष्ठ समाजनेते आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले ‘शाल बाबा’ म्हणून प्रसिद्ध असलेले स्वर्गीय मदन भावडा नाईक यांचे आज (९ मार्च २०२६) सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते १०५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बंजारा समाजासह राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
अल्पशिक्षित असूनही आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता, धाडसी स्वभाव आणि लोकाभिमुख नेतृत्वामुळे स्व. मदन नाईक यांनी समाजात विशेष स्थान निर्माण केले होते. पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये त्यांची ओळख एक प्रभावी व स्वाभिमानी समाजनेते म्हणून होती.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते. दुष्काळी परिस्थितीत लोकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. विदर्भातील वीज प्रश्नाच्या काळात हातात कंदील घेऊन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यासमोर जनतेच्या व्यथा मांडणारा तळागाळातील नेता म्हणून त्यांची ओळख होती.
त्यानंतरच्या काळात बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत स्वर्गीय नामदार भाऊसाहेब पांडुरंग फुंडकर यांना निकटचे सहकारी म्हणून साथ दिली. समाजातील प्रत्येकाशी आत्मीयतेने वागणारे, प्रेमळ स्वभावाचे आणि लोकांशी घट्ट नाते जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते सर्वपरिचित होते.
बंजारा संस्कृतीचे जतन करणारे स्व. मदन नाईक यांची डोक्यावरची पगडी आणि खांद्यावरची शाल ही त्यांची ओळख बनली होती. त्यामुळे समाजात आणि राजकीय वर्तुळात ते ‘शाल बाबा’ या नावाने प्रसिद्ध झाले होते.
स्वच्छतेला जीवनमूल्य मानत त्यांनी आयुष्यभर समाजसेवेचा ध्यास घेतला. गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित होऊन परिसर स्वच्छ ठेवणे, लोकांना प्रेमाने वागवणे आणि प्रत्येकामध्ये देव पाहणे हा त्यांचा जीवनमंत्र होता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवर माया करणारा, माणुसकीचा संदेश देणारा हा थोर समाजनायक आज आपल्यातून निघून गेला आहे.
त्यांच्या निधनाने बंजारा समाजासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून अनेक सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.



