शबनम न्यूज | प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ व माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. परभणी शहर महानगरपालिकेचे महापौर सय्यद इकबाल यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन या महिलांचा गौरव करण्यात आला. हा सन्मान सोहळा ८ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा कार्यालय, डॉ. आंबेडकर नगर, आयटीआय कॉर्नर, जिंतूर रोड, परभणी येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापौर पदावर निवड झाल्याबद्दल सय्यद इकबाल यांचा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ व माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रसिद्धी संपर्कप्रमुख भगीरथ बद्दर होते. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सय्यद इकबाल, सामाजिक कार्यकर्ते सुभाष पांचाळ, वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाढे, सामाजिक कार्यकर्ते कैलासभाऊ पतंगे, मुकुंद नंद तसेच ज्येष्ठ पत्रकार युनूस कच्ची उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्र पोलीस दलातील एएसआय राणी चोपडे, कोतवाली पोलिस स्टेशनच्या सुनिता वाव्हळे, होमगार्ड लक्ष्मी सोनटक्के, एसटी चालक करुणा पंडित, एसटी वाहक महानंदा केंद्रे, सामाजिक कार्यकर्त्या चंद्रकलाबाई कुटे, कवी-गायिका ललिता शिरसाठ, उषाताई पंचांगे, सुरेखा सिद्धार्थ तसेच क्रीडा क्षेत्रातील वैशाली गाढे व अंजली वाव्हळे आदी महिलांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रसिद्धी संपर्कप्रमुख भगीरथ बद्दर, जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा कार्याध्यक्ष तथा माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रमोद अशोकराव अंभोरे आणि सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष राहुल धबाले यांच्या पुढाकारातून करण्यात आले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.



