शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांना सुरळीत व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा मिळावा यासाठी महापालिका भवनातील विधी समिती दालनात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पाणीपुरवठा व्यवस्थेतील अडचणींवर सविस्तर चर्चा करून त्या लवकरात लवकर सोडवण्याबाबत निर्णय घेण्यात आले.
बैठकी दरम्यान प्रभागातील पाणीपुरवठ्याचे वेळेनुसार योग्य नियोजन करण्यावर भर देण्यात आला. तसेच ज्या भागांमध्ये पाईपलाईन जुनी झालेली आहे किंवा नवीन पाईपलाईन टाकण्याची गरज आहे, त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती अथवा बदल करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सर्व नागरिकांना पूर्ण दाबाने (फुल प्रेशरने) पाणी मिळावे यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
नगरसेविका सुजाता बोऱ्हाडे यांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्या गांभीर्याने घेत तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. प्रभागातील पाणी वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागाने समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली.
या बैठकीला नगरसेवक राहुल जाधव, नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, नगरसेवक निखिल बोऱ्हाडे तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक चांगल्या प्रकारे मिळाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, पाणीपुरवठ्याच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे मत नगरसेविका सुजाता बोऱ्हाडे यांनी यावेळी व्यक्त केले.



