प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अधिकाऱ्यांवर कारवाईची नगरसेवक संदीप वाघेरे यांची मागणी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील विविध परिसरांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या मुक्तपणे फिरताना दिसत असून, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण दगडे आणि प्रमोद बाबर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे मेलद्वारे केली आहे.
महानगरपालिकेकडून दरवर्षी भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी आणि लसीकरणासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात शहरात कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक सोसायट्या, गल्लीबोळ आणि सार्वजनिक उद्यानांमध्ये कुत्र्यांच्या टोळ्यांमुळे नागरिकांना मॉर्निंग वॉक करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या नसबंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्न नगरसेवक वाघेरे यांनी उपस्थित केला आहे.
या संदर्भात संदीप वाघेरे म्हणाले की, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न हा प्रशासनासाठी सर्वोच्च प्राधान्याचा असायला हवा. मात्र सध्या या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे जखमी होणाऱ्या नागरिकांच्या वेदना प्रशासनाने समजून घेत ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी प्रक्रियेचे ऑडिट करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, आक्रमक कुत्र्यांसाठी स्वतंत्र निवारा केंद्रे उभारावीत तसेच ‘डॉग बाइट’च्या घटनांनंतर तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी, अशा प्रमुख मागण्या त्यांनी मांडल्या.
दरम्यान, नागरिकांनीही या प्रश्नावर सक्रिय भूमिका घेत संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी अरुण कुमार दगडे (9049190817 / 878-8070665), pcmc Helpline तसेच सारथी हेल्पलाईन नंबर 8888006666 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वाघेरे यांनी केले आहे.



