भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांची प्रतिक्रिया
शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२६–२७ सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोपोलिटन रिजन (PMR) वर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भुयारी मार्ग, उन्नत रस्ते जाळे आणि औद्योगिक व आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.
भाजपा नेते व आमदार महेश लांडगे यांनी महाराष्ट्रा या विकासात्मक उपाययोजनांचा स्वागत करताना म्हटले आहे की, “महाराष्ट्राचे अर्थसंकल्प २०२६–२७ हा फक्त एक आर्थिक दस्तऐवज नाही, तर ‘विकसित महाराष्ट्र 2047’ कडे जाणारा रोडमॅप आहे. पुणे-पिंपरी-चिंचवड सारख्या महानगरांना आणि ग्रामीण भागांना समर्पित या धोरणांनी राज्याचा सर्वांगीण विकास सुनिश्चित केला आहे, हे स्पष्ट दिसते.
“पुणे मेट्रोपोलिटन रिजनचा सर्वांगीण विकास हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा घडवून आणेल. रोजगार, उद्योग, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याण या सर्व क्षेत्रांमध्ये यामुळे गती येईल. मुख्यमंत्री फडणवीस यांचे PMR वर लक्ष हे शहराच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही या रोडमॅपचा पूर्ण पाठिंबा देतो आणि पुण्याच्या नागरिकांसाठी सर्वोत्तम लाभ सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्नशील राहू. श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्र, जगद्गगुरू संत तुकाराम महाराज जन्मस्थान देहू विकास आराखडा, भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास, पुणे व पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक सक्षमीकरण, प्रदूषण नियंत्रण, जलस्त्रोत या मुद्यांवर राज्य सरकार शाश्वत दृष्टीकोनातून काम करीत आहे, असा विश्वासही आमदार लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये होणार अजितदादांचे स्मारक..!
राज्यातील विविध औद्योगिक प्रकल्प, महिला व शेतकरी कल्याण, तंत्रज्ञान आणि नवउद्योग प्रोत्साहन, तसेच सामाजिक कल्याण योजनांवरही या अर्थसंकल्पात भर दिला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून भव्य स्मारक उभारणे आणि त्यांच्या नावावर गतीमान नागरी सेवा पुरस्कार सुरू करण्याचे घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पात केली. पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजितसृष्टी व स्मारक’’ उभारण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मंजुर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे त्याला बळ मिळेल, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
“पुणे मेट्रोपोलिटन रिजनच्या विकासासाठी हा अर्थसंकल्प नवा गतीमान रोडमॅप ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे, पुणे आणि पिंपरी-चिंचवसह ग्रामीण परिसरातील नागरिकांना रोजगार, उद्योग, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याण या सर्व क्षेत्रांमध्ये शाश्वत लाभ मिळेल. या महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्पाचे आम्ही स्वागत करीत आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.



