spot_img
spot_img
spot_img

औद्योगिक विकासाला चालना देणारा सकारात्मक अर्थसंकल्प – संदीप बेलसरे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पावर पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना देणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण घोषणांचा या अर्थसंकल्पात समावेश असल्याचे त्यांनी म्हटले.

बेलसरे यांनी सांगितले की, राज्य सरकारने जाहीर केलेले उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ हे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. या धोरणाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या औद्योगिक क्लस्टरची उभारणी करण्याचा सरकारचा उद्देश आहे. तसेच ‘इन्वेस्ट महाराष्ट्र’ या डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करून उद्योग गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या धोरणामुळे २०४७ पर्यंत राज्याच्या उत्पन्नामध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य असून सुमारे पाच दशलक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र केंद्र स्थापन करण्याची तसेच त्यांच्यासाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापन करण्याची घोषणा करण्यात आल्याचेही बेलसरे यांनी नमूद केले. या घोषणांचे स्वागत करताना त्यांनी सांगितले की, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे तितकेच महत्त्वाचे आहे. विशेषतः पुरवठा साखळीत कार्यरत असलेल्या सूक्ष्म व लघु उद्योगांनाही या धोरणांचा प्रत्यक्ष फायदा मिळाला पाहिजे.

सूक्ष्म व लघु उद्योगांना बँका आणि वित्तीय संस्थांकडून सुलभ कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच सूक्ष्म व लघुउद्योगांसाठी स्वतंत्र विभाग किंवा आयुक्तालय स्थापन झाल्यास त्यांच्या विकासाला गती मिळेल, वार्षिक उलाढाल वाढेल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल, असे त्यांनी सांगितले.

याशिवाय स्टार्टअप उद्योगांसाठी महाफंड निर्माण करून वित्तीय सहाय्य सुलभ केल्यास नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळेल आणि मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्यास मदत होईल, असेही बेलसरे यांनी स्पष्ट केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!