शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा केल्या. यावेळी राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी काही धोषणा करण्यात आल्या आहेत.सर्व स्तरावरील नागरिकांसाठी सुलभ, किफायतशीर आणि गुणवत्तापू्र्ण आरोग्य सेवेची सुनिश्चिती करणे आणि त्याद्वारे राज्यातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान वाढवणे यासाठी आरोग्य सेवांचा विस्तार करून ती शेवटच्या टप्प्यापर्यंत सर्व नागरिकांना पोहचवण्याचे उद्दीष्ट आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विशेषज्ञ आरोग्य सेवा आणि संशोधनासाठी परिसंस्था म्हणून मेडिसीटीज स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक आरोग्य सेवांचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. ताण तणाव, जीवनशैलीजन्म आजार, मानसिक आरोग्य तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी सातारा जिल्ह्यातील दरे परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येईल. तसेच मुंबई महानगर परिसरात वेलनेस उत्कृष्टता केंद्र विकसीत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कर्करोग, मधुमेह व हृदय विकार अशा आजारांचे लवकर निदान करण्याकरिता एशियाई विकास बँकेच्या सहायतेतून ग्रामिण भागात दरवर्षी तपासणी मोहिम राबवण्यासाठी ४ हजार ५०० कोटी किमतीची प्रगती योजना प्रस्तावित आहे.
राज्यातील २९ महानगरपालिका, २४७ नगपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींमध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि आरोग्य विभागाच्या सर्व गुणवत्तापूर्ण सुविधा देण्याकरिता समन्वय साधणे आणि कामकाजाचे सनियंत्रण करण्यासाठी शहरी आरोग्य आयुक्तालयाची स्थापना करण्यास मान्यता दिली जात आहे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी दिली.
आयुष्यमान भारत , प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत उपचार संख्येत १३५६ वरून २३९९ इतकी वाढ करण्यात आली आहे. म्हणजे यामध्ये जवळपास १ हजार आजार वाढवण्यात आले आहेत.
अंगीकृत रुग्णालयाची संख्या १७९२ वरून ४५३७ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत जास्त खर्च होणाऱ्या नऊ प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारासाठी २२ लाख रुपयांपर्यंतची रक्कम राज्य हमी सोसायटीच्या निधीतून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. म्हणजे २२ लाखांपर्यंत पैसे राज्य सरकार देईल.
एम्स आणि आयआयएमच्या धर्तीवर उच्च गुणवत्तेच्या प्रशिक्षण व संशोधनासाठी नागपूर येथे भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्र आरोग्य संस्था स्थापन करण्यात येईल.राज्यात ३५ शासकिय वैद्यकीय महाविद्यालये कार्यान्वित आहेत. त्यापैकी नव्याने मान्यता दिलेल्या ११ महाविद्यालयांची बांधकामे विविध टप्प्यांवर आहेत.



