खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे-मुंबई महामार्गावर लोणावळ्याजवळील कार्ला फाटा येथील वाहतूक कोंडी सुटणार आहे. येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि सुरक्षेसाठी नवीन उड्डाणपूल उभारण्यास
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)ने मान्यता दिली आहे. ९० कोटी ३२ लाख रुपयांचा निधी उपअभियंता राहुल पवार यांनी मंजूर केला आहे. या पुलासाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.
कार्ला फाटा येथे मोठी वाहतूक कोंडी होत होती. सुटीच्या दिवशी या कोंडीत भर पडते. सातत्याने छोटे-मोठे अपघात होत होते. त्यामुळे कार्ला फाटा येथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे केली होती. त्यानुसार खासदार बारणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आई एकविरा देवीचे दर्शन घेण्यासाठी काही महिन्यांपूर्वी आलेल्या शिंदे यांनी कार्ला फाटा येथे उड्डाणपूल उभारण्याची घोषणा केली होती. या प्रकल्पासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.
याबाबत खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, राज्यभरातून देवीच्या दर्शनासाठी भाविक कार्ला येथे येत असतात. पर्यटननगरी लोणावळ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांचीही मोठी गर्दी असते. येथे अनेकदा अपघात होतात. वाहनांची मोठी गर्दी होते. रविवारी प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे उड्डाणपूल उभारण्याची नागरिकांची मागणी होती. त्यानुसार पूल उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. आई एकविरा देवी येथील विविध विकास कामांच्या शुभारंभासाठी आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उड्डाणपूल उभारण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार उड्डाणपूल उभारण्यास मान्यता मिळाली आहे.
या भागात होणारी वाहनांची गर्दी कमी करण्यास या पुलामुळे मदत होणार आहे. वाहतूक सुरळीत होईल. अपघातांचे प्रमाण घटेल. कार्ला लेणी, एकवीरा देवी मंदिर पर्यटकांना वाहतूक कोंडीला सामोरे लागणार नाही. या उड्डाणपूलासाठी ९० कोटी ३२ लाख रुपयांचा निधी एमएसआरडीसीने मंजूर केला आहे. आता लवकर निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात करावी, अशी सूचना खासदार बारणे यांनी एमएसआरडीसीला केली आहे.



