शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नगरसेविका अश्विनी संजय वाबळे यांनी विविध सोसायट्यांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
सेक्टर क्रमांक २ मधील इमारत क्रमांक १३, १४ तसेच परिसरातील इतर इमारतींतील रहिवाशांना मागील काही दिवसांपासून पाण्याच्या दाबाचा प्रश्न भेडसावत होता. याबाबत नागरिकांनी नगरसेविका वाबळे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर बाबळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.

पाहणीदरम्यान त्यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले आणि पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी करण्याचे आदेश दिले. नागरिकांना नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी मिळावे यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी स्थानिक रहिवाशांनी पाणीपुरवठ्याव्यतिरिक्त परिसरातील इतर नागरी समस्याही नगरसेविका बाबळे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागाशी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन वाबळे यांनी नागरिकांना दिले.
प्रभागातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष स्थळी जाऊन जाणून घेण्याच्या त्यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.



