पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
आळंदी : विश्वास संपादन करून चारचाकी वाहन घेऊन त्याचा अपहार केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १६ जानेवारी २०२६ ते ५ मार्च २०२६ दरम्यान ज्ञानेश आश्रम, दगडी बिल्डिंग समोर, ५४ फाटा, आळंदी येथे घडली.
याप्रकरणी विठ्ठल धोंडीराम सदगे (वय ४२, व्यवसाय इलेक्ट्रिशियन) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अंगद शिवाजी जाधव (वय ३०, रा. दत्त मंदिरजवळ, आळंदी देवाची) याच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम ३१६(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्या मालकीची ह्युंदाई कंपनीची पांढऱ्या रंगाची एक्सेंट (MH 14 GU 2029) ही कार दरमहा १८ हजार रुपये परतावा देण्याचे सांगून घेतली. मात्र त्यानंतर आरोपीने ना पैसे दिले ना गाडी परत केली. त्यामुळे विश्वासघात करून वाहनाचा अपहार केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी आरोपी अद्याप अटकेत नसून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.



